खंडाळा तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी पुन्हा एल्गार पुरुषोत्तम जाधव यांचा पुढाकार
पाणी प्रश्नावर खंडाळा एकवटणार
खंडाळा : खंडाळा तालुक्याच्या माथ्यावरील दुष्काळी कलंक पुसावा यासाठी नीरा देवघर व धोम बलकवडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समावेश करण्यात आला. तालुक्यातून दोन्ही प्रकल्पाचे कालवे प्रवाहीत झाले मात्र तरीही तालुक्याच्या वाट्याचे पाणी अद्याप मिळालेले नाही. या पाण्यावरुन सुरु झालेला लढयाची तीव्रता वाढू लागली आहे. तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी ‘आत्ता नाही तर कधीच नाही ‘ हे ध्येय घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी पुढाकार घेतल्याने तालुक्याची शक्ती पणाला लागणार आहे.
नीरा देवघरचे तालुक्याच्या वाटयाचे पाणी तातडीने मिळावे यासाठी खंडाळा येथे एक बैठक घेण्यात आली. यामध्ये जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, माजी सभापती एस. वाय. पवार , कारखान्याचे संचालक चंद्रकांत ढमाळ , शेतकरी संघटनेचे शामराव धायगुडे , तालुकाप्रमुख भूषण शिंदे यांसह शेतकरी उपस्थित होते.
पाणी परिषदेच्या माध्यमातून व खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठान यांची भूमिका वगळता तालुक्यातील एकाही लोकप्रतिनिधीने नीरा देवघर वरील अन्यायाबाबत आवाज उठवला नाही. त्यानंतर या प्रकल्पाचे हायवे क्रॉसिंग , धनगरवाडी , शेखमीरेवाडी व मोर्वे येथे रखडलेल्या कालव्याच्या कामात असलेले अडथळे दूर करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीनी मार्ग काढून कामे पूर्ण केली त्यामुळे वाघोशीपर्यंत पाणी पोहचले ही वस्तुस्थिती नाकारता येणारी नाही. परंतु त्यानंतर पाणीप्रश्नाने तोंड वर काढल्यावर त्यांनी कोणतीही भूमिका मांडली नाही. त्यामुळे . गावडेवाडी , शेखमिरेवाडी व वाघोशी या तीन उपसा सिंचन योजना प्रलंबित आहेत. त्या मार्गी लावल्याशिवाय पाणी प्रवाहीत होणार नाही.
नीरा देवघरच्या कालव्याचे वाघोशी गावापर्यत गेली काही वर्ष पाणी सोडले जात आहे मात्र लाभक्षेत्रातील शेतकऱ्याच्या बांधापर्यत अद्याप हे पाणी पोहचलेले नाही. तरीही पंचवीस वर्षात कधीही खंडाळा तालुक्याने या पाणी प्रश्नावर एकत्र येऊन संघर्ष करुन लोकप्रतिनिधीना जाब विचारला नाही. मात्र आता पाण्याबाबत खंडाळा तालुक्यात प्रचंड जागृती होऊन पाणी प्रश्नाचे घोडे नेमके कशात आडले होते? नीरा देवघरला पुरेसा निधी का दिला गेला नाही? या प्रश्नाची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. यासाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीनी एकत्र येवून नीरा देवघरच्या पाण्यासाठी आता कायपणची भुमिका घेतली. या पाणी प्रश्नावर खंडाळा एकवटला असुन ही एकी कायम राहिल्यास लवकरच नीरा देवघरचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे.
नीरा देवघर धरणाची पाणी साठवण क्षमता ११.९११ टीएमसी आहे. या धरणावर भोर,खंडाळा,फलटण, माळशिरस या ४ तालुक्यातील एकुण लाभक्षेत्र ९००१६ हेक्टर आहे. तालुक्यातील तीनही उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्यास सुमारे २७००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यासाठी प्रकल्पाच्या कालव्याची,पोटपाटाची, उपसा सिचंन योजनाची कामे पुर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी हा लढा उभारला जातोय.
II आधी पाणी मग राजकारण ..
खंडाळा तालुक्याचे हक्काचे पाणी राजकारणातील निष्क्रियतेमुळे आजपर्यंत मिळू शकले नाही. वास्तविक यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. याबाबत त्यांची सकारात्मकता आहे. उपलब्ध केलेल्या सुमारे ३९०० कोटी निधीमध्ये उपसा सिंचनचा समावेश आहे का ? असेल तर त्याचा आराखडा का पूर्ण नाही याबाबत विचारणा करण्यासाठी सिंचन विभागात अधिकार्यांसमवेत बैठक घेणार आहे. त्यासाठी तालुक्यातील सर्वांनी उपस्थित रहावे. राजकारणापेक्षा तालुक्याला पाणी मिळणे महत्वाचे आहे. ॥ पुरुषोत्तम जाधव , जिल्हाप्रमुख शिवसेना