‘अजिंक्यतारा’ शेतकरी हिताशी कधीही तडजोड करणार नाही आ. शिवेंद्रसिंहराजे; कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत सपंन्न
भुईंज : (महेंद्रआबा जाधवराव) बचत, काटकसर आणि नेटके नियोजन याद्वारे अजिंक्यतारा साखर कारखाना प्रगतीपथावर पोहचला आहे. संस्थेची प्रगती आणि सभासद- शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साध्य झाले असून सभासद, शेतकरी आणि कामगार यांच्या अनमोल सहकार्यामुळेच कारखान्याच्या प्रगतीचा आलेख चढता राहिला आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. दरम्यान, नेहमीप्रमाणे आगामी गळीत हंगामातही आपला सर्वच्या सर्व ऊस अजिंक्यतारा कारखान्याला घालून आपले सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
शेंद्रे ता. सातारा येथील अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात, मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सभेत आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सर्व आजी, माजी संचालक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश सावंत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कमी क्षेत्रात उच्चांकी उत्पादन घेणाऱ्या आणि कारखान्यास विक्रमी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यकारी संचालक मोहिते यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले. सभासदांनी हात वर करून एकमताने सर्व विषयांना मंजुरी दिली. यावेळी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या तसेच कारखान्याला विक्रमी ऊस पुरवठा करणाऱ्या विविध गावातील १९ शेतकऱ्यांचा रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कारखान्याची गाळप क्षमता १० हजार मे.टन प्रतिदिन एवढी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून शासनाचे इथेनॉल धोरण व इतर आवश्यक बाबींचा विचार करून याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त गाळप करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांनी जे स्वप्न पहिले होते ते सत्यात उतरले असून हे दिवस सभासद आणि कामगारांच्या अनमोल सहकार्यामुळे दिसत आहेत हे कोणीही विसरणार नाही. येणाऱ्या उसाला उच्चतम दर देण्यासाठी योग्य ती ठोस पावले कारखाना व्यवस्थापन उचलत आहे, असे ते म्हणाले. अजिंक्यतारा हि संस्था आपल्या सर्वांची हक्काची मातृसंस्था आहे. आपल्या सर्वांचे सहकार्य नेहमीच मिळाले असून यापुढेही आपलं सहकार्य नेहमीप्रमाणे कायम ठेवा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केले.
माजी व्हा. चेअरमन विश्वास शेडगे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. सभेला पंचायत समितीचे माजी सभापती धर्मराज घोरपडे, दादा शेळके, राहुल शिंदे, लालासाहेब पवार, अरुण कापसे, बाळकृष्ण फडतरे, अजिंक्यतारा सूत गिरणीचे उत्तमराव नावडकर, जालिंदर महाडिक, वसंतराव टिळेकर, पदमसिंह फडतरे यांच्यासह विविध संस्थांचे आजी- माजी पदाधिकारी, सभासद- शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.