शिक्षण, ग्राम विकासासाठी उपग्रहांचा वापर सर्वोत्तम पर्याय- शास्त्रज्ञ डॉ शिरीष रावण
सातारा -प्रतिनिधी गावाच्या गरजा ओळखून शाश्वत विकासासाठी वित्त आयोगाचा परिपूर्ण आराखडा करताना उपग्रहांवरील उपलब्ध माहितीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी प्राधान्याने पर्यावरणाचा समतोल राखून विज्ञानावर आधारित ग्रामविकास साध्य करावा. भारतीय अंतरिक्ष संशोधन अफाट असून कृषी, शिक्षण, पर्यावरण, जलसंधारण, भौगोलिक परिस्थिती काल, आज , उद्या समजून घेण्यासाठी उपग्रहांवरील संकलित माहिती हे वरदान आहे. शिक्षण, ग्राम विकासासाठी उपग्रहांचा वापर हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन अंतरिक्ष शास्त्रज्ञ डॉ. शिरीष रावण यांनी केले.
वर्ये येथे रयत शिक्षण संस्थेचे सायन्स सेंटर आणि पंचायत राज प्रशिक्षण केंद्राने इसरोच्या चंद्रयान -३ च्या यशस्वीतेला वर्षपूर्ती निमित्ताने “चला, उपग्रहांवरील संकलित माहितीचा पुरेपूर वापर करु या.” यावर सरपंच, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थींसाठी कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. पुणे येथील अर्थ साईट फाऊंडेशन आणि दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अंतरिक्ष संशोधक अव्दैत कुलकर्णी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना अंतरिक्ष गाथा उलगडून दाखवत वेगवेगळ्या उपग्रहांची उपयुक्तता , चंद्रयान , पर्यावरणाच्या घडामोडी , अंतरिक्ष क्षेत्रातील करिअरच्या संधी सांगून उपग्रहांवरील माहितीचा वापर कसा करु शकतो, याची सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावर विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करत अंतरिक्ष संशोधनाचे कुतूहल निर्माण केले.
गुगल अर्थ, दृष्टी पोर्टल, ग्राम मानचित्र ,भूवन २ डि२.डी यावर अफाट माहिती उपलब्ध असून मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी ती वापरली पाहिजे. याची सविस्तर माहिती देत युवा संशोधक संकेत शेटे आणि विनीत धायगुडे यांनी प्रत्यक्ष
पोर्टल, वेबसाईट ओपन करत प्रशिक्षण देत सरपंच, ग्रामसेवक, विद्यार्थ्यांचे विचार सक्षम केले.
सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अमेय जोशी यांनी प्रास्ताविक करताना, ‘दीपस्तंभ’चे लोकसहभागातून पर्यावरण, जलसंधारण, शिक्षण, आरोग्य, सौरऊर्जा क्षेत्रात राज्यातील १५० हून अधिक गावात उपक्रम सुरू असल्याचे सांगून अंतरिक्ष संशोधकांना सोबत घेऊन आता विद्यार्थी, सरपंच, ग्रामसेवकांनी विज्ञान,संशोधनाचा वापर करून सामाजिक प्रगती अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
रयत सायन्स सेंटरचे संचालक डॉ.सारंग भोला यांनी स्वागत तर पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी आदित्य टेकाळे, लक्ष्मण सुर्यवंशी, नितीन क्षिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
अर्थ साईट फाऊंडेशन आणि दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या टीमने कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. जिल्हयातील विविध शाळा, कॉलेजचे तब्बल २९२ विद्यार्थी,शिक्षक तर गटविकास अधिकारी,सरपंच, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.