गमेवाडीतील जटेश्वर पर्यटन स्थळास राज्य शासनाची मंजुरी
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नामुळे यश, जटेश्वर परिसराचा होणार कायापालट
कराड प्रतिनिधी – गमेवाडी ता.कराड येथील जटेश्वर निसर्ग पर्यटन स्थळास वन विभागाच्या महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ नागपुरने मंजुरी दिली आहे . या पर्यटन केंद्रासाठी चार कोटी ८९ लाख ११ हजार रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या पाठपुराव्यातुन या पर्यटन स्थळास मंजुरी मिळाली आहे.
गमेवाडीतील जटेश्वर निसर्ग पर्यटन केंद्रास मंजुरी देण्यात आली असल्याने परिसरातील निसर्ग सौंदर्याबरोबरच तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे परिसराचा कायापालट होणार आहे.
संतोष जाधव निसर्ग मित्र गमेवाडी
जटेश्वर परिसरात निसर्ग पर्यटन केंद्र सुरु करण्यासंदर्भात एक प्रस्ताव तयार करुन तो वन विभागाला संतोष जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला होता. त्या प्रस्तावाची जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर तपासणी करण्यात आली. तो प्रस्ताव मंजुर करण्यासाठी पालकमंत्री देसाई यांनीही पाठपुरावा केला होता. त्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा महाराष्ट्र निसर्ग विकास मंडळाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष एस. जी. टेंभुर्णीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात गमेवाडीतील जटेश्वर निसर्ग पर्यटन केंद्रास मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्राच्या मंजुरीसाठी सातारा जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पालकमंत्री यांचे स्वीय सहाय्यक प्रल्हाद हिरामनी, तत्कालीन उपवन संरक्षक भुपेंद्र हाडा, तत्कालीन गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, डॉ. आबासाहेब पवार यांचेही सहकार्य लाभले. या पर्यटन केंद्राअंतर्गत निसर्ग पाऊलवाटा आणि बळकटीकरण करणे, मचान झाडावरील छोटी घरे तयार करणे, पर्यटकांसाठी बेचेस बसवणे, लाकडी कमान करणे, निसर्ग माहिती फलक तयार करणे, झाडांना कट्टे बांधणे, विविध औषधी वनस्पतींचे रोपण करणे, रोपवन तयार करणे, वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करणे, सेल्फी पॉईंट तयार करणे, वन तलावातील गाळ काढणे, साहसी खेळ सुविधा तयार करणे, निरीक्षण मनोरे तयार करणे, पानवठे. वनतलाव, गाळ काढणे आदि कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या परिसराचा कायापालट होवुन त्या परिसरात पर्यटन वाढीस चालणार मिळणार आहे.