गौतम बुद्धांनी मानवी चंचल मनाला शांतीचा मार्ग दिला कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात पाली भाषा कार्यशाळा संपन्न
सातारा : . ‘बिहारच्या भूमीमध्ये बुद्ध आणि महावीर ही दोन माणसे जन्मास आली. या दोन विचारवंतानी सर्व माणसांचे जगणे सुसह्य केले आहे. पाली भाषेतून बुद्धांनी धम्म प्रसार केला. गौतम बुद्धांची वचने ही पाली भाषेत संग्रहित करण्यात आली आहेत. हे अक्खे जग कवेत घेण्याची क्षमता असते तोच माणूस प्रबुद्ध होतो. गौतम बुद्ध हे प्रबुद्ध होते.अलेक्झांडर हा केवळ रोम पासून आला होता. त्याला हे जग जिंकता आले नाही. बुद्धांनी तलवारीच्या बळावर हे जग जिंकले नाही. बुद्ध करुणाशील होते. बुद्ध, माणसाला दुःखमुक्त करण्यासाठी जगभर गेले. बुद्धांचे अनुयायी जगभर गेले.आज जगभरात आपल्याला बुद्धांचे अनेक पुतळे पहायला मिळतात. केवळ भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर विविध देशात बुद्ध विचार गेले.माणसांचे मन उन्नत व उदात्त करणारां उपदेश त्यांनी केला. त्यांनी समाजाला नेहमीच कुशल कर्म करायला सांगितले.बहुजनांचे हित करण्यासाठी बुद्धांनी जगाचा समग्र कानाकोपरा पादाक्रांत केला. मानवी चंचल मनाला त्यांनी शांतीचा मार्ग दिला’’ असे विचार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांनी व्यक्त केले. ते सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे आयोजित केलेल्या पाली भाषा मुलभूत ज्ञान परिचय कार्यशाळेच्या समारोप समारंभात सहभागीना मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यशाळेचे आयोजन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळ,मराठी विभाग व पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई ,यांनी संयुक्तरित्या केले होते. भारतीय ज्ञान प्रणाली प्रसार अंतर्गत पाली भाषा जतन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने हे आयोजन केले होते.यावेळी पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईचे अरविंद भांडारे,विकास ढवळे,विद्यापीठाच्या मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता अनिलकुमार वावरे,आंतरविद्याशाखा विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.आर.आर.साळुंखे, पाली भाषा कार्यशाळेचे समन्वयक व विद्यापिठाच्या भाषा मंडळाचे संचालक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे ,इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
भाषा मिळाल्यामुळे माणसात झालेल्या परिवर्तनाची माहिती देताना ते पुढे म्हणाले ‘ मानवी उत्क्रांतीत माकडापासून माणूस होण्याची प्रक्रिया खूप महत्वाची आहे. चार पायाचे माकड द्विपाद झाले .त्या काळी ६० किलो माकडाचा मेंदू फक्त ६०० ग्रँम होता. याच माकडाचा मेंदू पुढे १४०० ग्राम मेंदूचा झाला. माकडाला भाषा चांगली कळते . उत्क्रांतीत माकडाच्या मध्ये बदल झाले,. माकड माणूस स्वरांची माहिती घेऊ लागला .भाषा आल्याबरोबर प्राण्यात फार मोठी क्रांती झाली. भाषेत स्मृतीचा उपयोग होऊन ज्ञानाचा जगभर संचय होत केला. भाषेएवढे मोठे विज्ञान नाही. समाजाच्या मनाची गुरुकिल्ली भाषा आहे. ज्ञान आहे ,पण भाषा येत नसेल तर व्यक्त कसे करणार ? केवळ हावभाव असते तर एवढी प्रगती नसती झाली. म्हणूनच भाषेचे संवर्धन हे मनापासून केले पाहिजे.पाली भाषा हे अक्षर वाड्मय आहे. विद्यापीठ झाल्यानतर आपली जबाबदारी वाढली आहे.वाईट विचाराला वेसण घालण्याचे काम आपल्याला करायचे आहे. आपण चांगले शिक्षण द्यायला हवे. शिक्षणात बिघाड नको. म्हणून विद्यार्थी ,शिक्षक अगदी सर्वांनी प्रचंड वाचले पाहिजे,विश्लेषण केले पाहिजे. आता आपण केवळ लोकल राहिलो नाही. आपण वैश्विक ज्ञान आत्मसात केले पाहिजे. माणूस जिवंत असणे म्हणजे भाषा.भाषेला व्याकरणाचे सौष्ठव असले पाहिजे. भाषेने नवसमाजाची निर्मिती करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. सेवानिवृत्त सुरेश शेडगे हे दोन दिवसाच्या कार्यशाळेत सहभागी झाल्याबद्दल कुलगुरुनी त्यांचे कौतुक केले. बाळ जन्माला आल्यापासून ते जीवनाचा अखेरचा श्वास घेइपर्यंत ज्ञान घेतले पाहिजे ‘अत्त दीप भव’ हे बोधवाक्य विद्यापीठाने निवडले हे त्यातील अर्थामुळे. आपण आपली रडगाणी न गाता स्वावलंबी होऊन सन्मानाने जगले पाहिजे .आम्ही बुद्ध ,कर्मवीर यांच्या विचारांचे समृद्ध पाईक आहेत. जे जगात योग्य आहे ,कालंत्रयी आहे व टिकाऊ आहे. ते स्वीकारले जाणारच.जे टिकाऊ व उपयोगी नसेल तर ते स्वीकारले जात नसते. असेही ते म्हणाले.
कार्यशाळेच्या प्रारंभी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. सौ.साधना पाटोळे,प्रथमेश हबळे,प्रा.सुमती माने -कांबळे ,या सहभागींनी कार्यशाळेतील अनुभव सांगून पाली व्याकरण व साहित्य याबद्द्द्ल चांगली माहिती मिळाल्याबद्दल व पाली-मराठी वाक्ये तयार येऊ लागल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पाली रिसर्च इन्स्टिट्यूटचे अरविंद भंडारे व विकास ढवळे यांनी मनोगतात ,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाने उत्तम आयोजन करून पाली प्रसारासाठी संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के व इतर मान्यवर यांच्याहस्ते कार्यशाळेत सहभागी झालेल्या निवडक प्रतिनिधीना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले .या कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.आबासाहेब उमाप यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ.विद्या नावडकर यांनी केले कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. डॉ.रोशनआरा शेख, उपप्राचार्य डॉ.रामराजे देशमुख ,प्रा.डॉ.सविता मेनकुदळे ,पाली अभ्यासक डॉ.मीना इंजे, प्रमोद पोळ, तसेच सातारा,पुणे,सांगली जिल्ह्यातील विविध महाविद्यालय ,विद्यालयातील शिक्षक, ज्येष्ठ नागरिक असे कार्यशाळेस एकूण ८० प्रतिनिधी उपस्थित होते. या दोन दिवशी तीपिटक ग्रंथातील पाली-मराठी भाषेतील बुद्ध विचार ग्रंथाची अनेकांनी खरेदी केली.