यशोदा इन्स्टिट्यूट आणि एच.सी.एल. टेक्नॉलॉजी यांच्यामध्ये महत्वपूर्ण सामंजस्य करार
विविध स्पर्धा परीक्षांसह, इंटर्नशिप आणि प्लेसमेंट साठी ठरणार उपयोगी
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ, यशोदा टेक्निकल कॅम्पस आणि एच सी एल टेक्नॉलॉजी यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारामुळे यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील विद्यार्थ्यांसाठी करिअरचे नवे मार्ग उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी तसेच इंटर्नशिप च्या माध्यमातून प्रात्यक्षिक ज्ञान मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे एच सी एल टेक्नॉलॉजी त्यांच्याकडून विशद करण्यात आले.
एच सी एल टेक्नॉलॉजी ही माहिती तंत्रज्ञानातील एक नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी असून विविध स्तरावर कार्यरत आहे. या कंपनीकडून देशभरातील विविध स्पर्धा परीक्षा घेण्याचे कार्य चालू असते. एचसीएल टेक्नॉलॉजी कडून इथून पुढे होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे अधिकृत परीक्षा केंद्र म्हणून यशोदा टेक्निकल कॅम्पस कार्यरत राहणार आहे.
यशोदा टेक्निकल कॅम्पस ची ओळख ही अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देणारी शिक्षण संस्था अशी नावारूपाला आली आहे. त्याअंतर्गत आजपर्यंत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सह अन्य नामांकित कंपन्यांसोबत हजारो परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्याचे कार्य संगणक विभागाकडून झाले आहे.
यशोदा मधील इंजिनिअरिंग, पॉलीटेक्निक, आर्किटेक्चर, फार्मसी, बीबीए, बीसीए, एमबीए, एमसीए या सर्वच विद्या शाखातील विद्यार्थी हे संगणकीय ज्ञानामध्ये अग्रेसर राहिलेले आहेत. यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या या सामंजस्य करारासाठी यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांनी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व योजना राबवण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील बदलाशी सुसंगत राहता येईल या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला असल्याचे यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे कुलसचिव श्री गणेश सुरवसे यांनी सांगितले. कॅम्पस मधील संगणक विभाग अधिकाधिक पायाभूत सुविधा सोबतच अत्याधुनिक बदलांना सामावून घेण्यासाठी सज्ज असल्याचे ते म्हणाले