समाजप्रबोधन कार्यात दशरथ ननावरे यांचे मोठे योगदान .
बाळकृष्ण महाराज वसंतगडकर , शिवसमर्थ पुरस्काराचे वितरण
पाटण : समाजासाठी अव्याहतपणे काम करणे हा सामाजिक कार्यकर्त्याचा स्थायीभाव असतो. समाजप्रबोधन हे लोकसेवेचे एक प्रभावी अंग आहे. शैक्षणिक कार्याबरोबर समाजप्रबोधनात दशरथ ननावरे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच राज्यातील नावाजलेल्या वक्त्यांमध्ये त्यांची गणना होते. इतिहास अभ्यासक म्हणून त्यांनी केलेले काम प्रेरक आहे. शिवसमर्थ पुरस्कारामुळे त्यांना पुढील काळातील कामासाठी बळ मिळेल असे मत संतचरणरज बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांनी व्यक्त केले.
सडादाढोली पाटण येथे रामघळ कुबडीतीर्थ ट्रस्टच्या वतीने आयोजित ‘ शिवसमर्थ पुरस्कार ‘ वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष चिमाजी झोरे , कार्याध्यक्ष नथुराम झोरे , सचिव सीताराम झोरे , धोंडीबा झोरे , बाबूराव झोरे , बहिरु झोरे , विठ्ठल झोरे , प्रा.जानू झोरे , वैभव झोरे यांसह प्रमुख उपस्थित होते.
यावेळी इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांना मानपत्र , सन्मानचिन्ह देऊन शिवसमर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वसंतगडकर महाराज म्हणाले , सामाजिक , शैक्षणिक आणि ऐतिहासिक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. समाजप्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती करून तरुण पिढीला विधायक मार्गावर आणण्यासाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्रात शिवचरित्र आणि सामाजिक विषयावरील व्याख्यांनातून समाज घडविण्याचा त्यांचा अखंड प्रयत्न राहिला आहे. तसेच शेकडो गडकिल्ल्यांच्या मोहिमेतून अभ्यासपूर्ण लेखन तसेच शिवचरित्रावरील प्रासंगिक लेखन करून समाजजागृती केली आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे म्हणाले , मातृभूमीमध्ये मनुष्य जन्मतो मात्र कर्मभूमीमध्ये तो घडतो. या कर्मभूमीतून मिळालेला हा पुरस्कार बळ देणारा आहे. अतिशय बिकट परिस्थितीत येथे लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. या संघर्षमय काळातही लोकसेवेचं व्रत जोपासलं. प्रामाणिक सेवेचं हे फळ घरच्या लोकांनी केलेल्या सत्कारासम आहे. पुढील काळातही हे समाजसेवेचं व्रत कायम जोपासणार आहे.