Follow us

Home » राज्य » शिक्षण » स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल – खासदार शरदरावजी पवार

स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल – खासदार शरदरावजी पवार

स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल –  

              – खासदार शरदरावजी पवार 

सातारा दि.९ – दिवसेंदिवस शिक्षणक्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल होत असून याबाबत केंद्र सरकारचे धोरण बदलत आहे अशावेळी गुणवत्तेच्या क्षेत्रात लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. हे जग स्पर्धेचे असून आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी शिक्षणक्षेत्रातून तयार करावयाची आहे, असे मत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. खासदार शरदचंद्रजी पवार यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६५ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाइस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, खा. श्रीनिवास पाटील, रामशेठ ठाकूर, विविध विभागांचे सहसचिव प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, श्री. बी.एन. पवार, कर्मवीर कुटुंबीय, जयश्री चौगुले, मीनाताई जगधने, प्रभाकर देशमुख, अॅड.रवींद्र पवार व अॅड. दिलावर मुल्ला, सचिव विकास देशमुख, यांची प्रमुख उपस्थिती होती.

 रयत शिक्षण संस्थेत झालेल्या प्रशासकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मा. शरदचंद्रजी पवार पुढे म्हणाले की रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासनात बदल करण्याचा निर्णय आम्ही घेतला यामुळे आता स्थानिक प्रश्न सुटू लागले आहेत. रयत सेवक व रयतचा कार्यकर्ता हा संस्थेचा ठेवा आहे. यांच्यामध्ये सामंजस्य कसे राहील याची काळजी आपणास घ्यावी लागेल. गेल्या वर्षात एकही प्रस्ताव माझ्याकडे आला नाही. एकंदरीत प्रशासनात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. याचा मला आनंद आहे. सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्याबाबत शिक्षण-सुविधा कशी देता येईल याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आता उद्योग, आरोग्य व शिक्षण अशा विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. आपण याबाबत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीबरोबर करार केला आहे. बारामतीत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी करार केल्याने कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढली आहे. १००० शेतकऱ्यांची यासाठी निवड केली होती. शेतकऱ्यांना पीकवाढीची कारणमीमांसा सांगितली. रयत शिक्षण संस्थेने शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गुणवत्ता हा आज महत्त्वाचा भाग असून सतत बदल होत आहेत, या सर्वांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून संस्थेची वाटचाल त्या दृष्टीने सुरू आहे असे ते म्हणाले. 

संस्थेच्या वार्षिक घडामोडीचा आढावा घेताना चेअरमन चंद्रकांत दळवी म्हणाले की अधिकारी म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर संस्थेत प्रामुख्याने बदल्यांचे प्रश्न जास्त होते. बदल्याच्या संदर्भात सर्वाना विश्वासात घेऊन अभ्यासपूर्वक बदल करण्यात आले त्यामुळे बदलीचे प्रश्न मार्गी लागले. रयत सेवक हीच खरी संपती आहे. संस्थेचे जे हंगामी ३५० शिक्षक कोर्टात गेले त्यांना संस्थेने सेवेत समावून घेतले. २६२७ पैकी ३५० जनाचा प्रश्न मार्गी लागला असला तरी इतर सेवकांचा प्रश्न मार्गी लागावा. यासाठी संस्था प्रयत्न करीत आहे. पवित्र पोर्टलद्वारे ६५० शिक्षकांची निवड झालेली आहे मात्र आपल्या हंगामी शिक्षकांनी औरंगाबाद कोर्टात पिटीशन दाखल केले आहे. पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेले शिक्षक व उर्वरित सर्व हंगामी शिक्षक या सर्वांनाच संस्थेत सामावून घेतले जाईल मात्र आपल्या हंगामी शिक्षकांनी भरती प्रक्रिया पूर्ण होणेसाठी कोर्टातून दावे मागे घ्यावेत असे जाहीर आवाहन केले आहे. सहायक विभागीय अधिकारीपदावर निवड करताना सेवानिवृत्त सेवकांऐवजी सेवेत असणाऱ्या रयत सेवकाची निवड करण्याचा निर्णय घेतला. शाखा व शाखाप्रमुख यांचे वर्गीकरण केल्यामुळे बरेचसे प्रश्न मार्गी लागले. संस्था व शासनाचा शिक्षण विभाग यांच्यामध्ये सामंजस्य आणि चांगला समन्वय आहे. ७५२ शाखांची माहितीपुस्तिका तयार करण्यात आलेली असून कर्मवीरांनी ज्या प्रमाणे समाजाशी चांगले संबंध ठेवले त्याप्रमाणेच आजही माहितीपुस्तिका घेऊन गावागावात जाऊन विद्यार्थी संख्या वाढवली पाहिजे. पटसंख्या सतत वाढत राहिली पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी त्यानी रयत शिक्षण संस्थेची कार्यदर्शिका, वार्षिक अहवाल, CIII सेंटर, अटल टिंकरिंग लॅव, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, केम्ब्रिज, साउथ कोरियन सामंजस्य करार, कुंभोज येथील प्रशिक्षण केंद्र, नवीन शैक्षणिक धोरण याविषयी माहिती दिली व संस्थेत कला शिक्षक, व क्रीडा शिक्षक यांची गरज असल्याचे सांगितले. 

संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील यांनी मनोगतात नवीन शैक्षणिक धोरणाची संस्थेतील अंमलबजावणी याबाबतची माहिती दिली. भविष्यात येऊ घातलेले प्रश्न व आव्हाने यांना सामोरे जाणारा विद्यार्थ्याला कालानुरूप अभ्यासक्रम देण्याची गरज आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. गुरुकुल फौंडेशन, गुरुकुल अकॅडमिक अशी रचना करून गुणवतेचे शिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले. रयतच्या प्रत्येक विद्यार्थांना इंग्लिश भाषेतून संवाद करता यायलाच पाहिजे. किमान ५ मल्टीस्कील आम्ही विद्यार्थ्यास देत असून आयटी, बँकिंग, फायनान्स, स्पर्धा परीक्षा, मिलिटरी इ. क्षेत्रात विद्यार्थी घडतील. नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात रयत शिक्षण संस्था, देशाला दिशा देणारा पायलट प्रोजेक्ट ठरेल. 

या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.संभाजी पाटील व सहकारी यांनी रयत गीत गायन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. कार्यक्रमांमध्ये संस्थेचा वार्षिक अहवाल, रयत विज्ञान पत्रिका, शाखा माहिती पुस्तिका, संस्थेचे अकॅडमिक कॅलेंडर, शब्दगंध इत्यादीचे प्रकाशन व नूतनीकरण केलेल्या कर्मवीर स्मृतीभवनाचे उद्घाटन मा. शरदरावजी पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर उपस्थितांचे आभार संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी मानले. प्रा. डॉ. सविता मेनकुदळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, जनरल बॉडीचे सदस्य, लाइफ मेंबर्स व लाईफ वर्कर्स, प्राचार्य, मुख्याध्यापक, रयत सेवक व रयतचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू 

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू  खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर

Live Cricket