Follow us

Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाराष्ट्राला संगीत नाटकांची दिडशे वर्षांची परंपरा आहे : निर्मला गोगटे

महाराष्ट्राला संगीत नाटकांची दिडशे वर्षांची परंपरा आहे : निर्मला गोगटे

महाराष्ट्राला संगीत नाटकांची दिडशे वर्षांची परंपरा आहे : निर्मला गोगटे

वाई प्रतिनिधी –नाना विविध रुची असणाऱ्या साऱ्यांची तृप्ती एकत्रित रितीने करू शकते अशी एकमेव कला म्हणजे नाटक, असे कवी कुलशीरोमणी कालिदा कालिदासाने सांगितले आहे. नाटकाच्या या रंगभूमीला जेव्हा संगीताची सोबत मिळाली तेव्हा एका संगीतमय प्रवासाला सुरुवात झाली.असे मत ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे यांनी आपल्या मुलाखतीतून मांडले.लोकमान्य टिळक संस्था संचालित १०८व्या वसंत व्याख्यानमालेच्या सतराव्या पुष्पात संगीत रंगभूमीचा संगीतमय प्रवास या विषयावर त्या मुलाखत देत होत्या. शैला मुकुंद यांनी मुलाखतकराची भूमिका बजावली.

यावेळी संगीत सादरीकरणासाठी वाईच्या प्रख्यात गायिका सौ स्नेहा मराठे, तबलावादक श्री. नितीन देशमुख व हार्मोनियमवादक सौ अंजली राणे हे मंचावर उपस्थित होते.

नांदी गायनाने या मुलाखतीची सुरुवात करण्यात आली. यानंतर निर्मला गोगटे यांनी मानापमान मधील एका संवादाचे वाचन केले.

निर्मला गोगटे यांनी मुलाखतीत सांगितले की महाराष्ट्राला संगीत नाटकाची जवळपास १५०वर्षांची परंपरा आहे. १८४३मध्ये विष्णुदास भावे यांचे सीता स्वयंवर हे नाटक संगीत रूपात आले. म्हणूनच त्यांना मराठी संगीत नाटकाचे जनक म्हणतात. यानंतरचे मोठे संगीत नाटक म्हणजे संगीत शाकुंतल. नाटकामध्ये नट, दिग्दर्शन, लेखन याहून महत्त्वाचा असतो तो म्हणजे प्रेक्षक वर्ग, असे स्वतः कालिदासानेच लिहून ठेवले आहे. महाराष्ट्रात संगीत नाटक रुजवण्यात अण्णासाहेब किर्लोस्कर ,भास्कर बुवा, विष्णुदास भावे अशा कित्येकांचा हात आहे. 1950 नंतर साधारणतः स्त्रिया रंगभूमीवर येऊ लागल्या होत्या.

रंगभूमीच्या व मैफिलीच्या संगीतात फरक असतो. नाट्य संगीतात आलाप पाच ते सात मिनिटात बसवता आला पाहिजे. मैफिल ही संगीतानुसार पुढे सरकत असते नाटक मात्र पुढे सरकत राहते आणि संगीताला त्याच्याबरोबर चालावे लागते. नाटकात नांदीचं पहिलं गाणं रंगलं नाही तर नाटक पडण्याची भीती असते.

१८८२ मध्ये सौभद्र हे संगीत नाटकांच्या इतिहासातलं सर्वात गाजलेलं नाटक किर्लोस्कर यांनी लिहिलं. या नाटकाने मराठी संगीत रंगभूमीला अत्युच्च दर्जावर पोहोचवलं.

बालगंधर्वांनी स्वतःला नटवलं, संगीताला नटवलं आणि रंगभूमीलाही सजवलं. मराठी रंगभूमीला सौंदर्यदृष्टी दिली. तुम्ही इतर कला शिकलात तर तुम्हाला सौंदर्यदृष्टी प्राप्त होते पण संगीत शिकलात तर तुमची वृत्तीच सौंदर्यमय होते असे निर्मला गोगटे यांनी सांगितले.

भास्करबुवांपासून अभिषेकी पर्यंत संगीत नाटकातील अनेकांवर या मुलाखतीत चर्चा झाली. तसेच सध्याच्या काळात संगीत नाटके होत नसल्याची खंत निर्मला गोगटे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमामध्ये स्नेहा मराठे यांनी ‘सौभद्र’ मधील ‘वद जाऊ कुणाला शरण’, ‘द्रौपदी’ मधील ‘मज भयन असे’, ‘संशयकल्लोळ’मधील ‘मजवरी तयांचे प्रेम खरे’, ‘लेऊ कशी वल्कला?’ आदी सादर केले. निर्मला गोगटे यांनी स्वतः ‘माडीवरी चल गं गडे’ गाण्याचे संस्कृत पद सादर केले. मुलाखतीचा शेवट त्यांनी भैरवी म्हणून केला

माया अभ्यंकर यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. वसंत लक्ष्मण शेंडे यांचे स्मृत्यर्थ श्रीमती विजया वसंत शेंडे यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे प्रायोजन करण्यात आले . रसिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket