नीतीन पाटलांची खासदारकी म्हणजे सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या तत्त्वाचा बळी – विराज शिंदे
वाई – नूतन खासदार नितीन पाटील यांच्या निवडीचा आम्हालाही आनंद आहे परंतु सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा त्यांना विसर पडला याचे दुःख आहे. नूतन खासदारांची कराड येथे प्रीतीसंगमावर जाऊन ज्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्या चव्हाण साहेबांनी आयुष्यभर जपलेले विकेंद्रीकरणाचे सुत्र पाटील कुटुंबियांनी पायदळी तुडविले असून सरपंचपदापासून ते खासदारपदापर्यंतची सगळी पदे आपल्यास घरात बळेबळे कोंबली आहेत अशी टिका काँग्रेसचे नेते विराज शिंदे यांनी केली आहे.
आपल्याच घरात पदे ओढून घेत असताना आमदार महोदयांनी एकामागून एक घराणी संपविली असे नमूद करताना विराज शिंदे म्हणाले, की आमदारांनी पाच वेळा मदन भोसले यांचा पराभव केला अशी दर्पोक्ती नीतीन पाटील यांनी केली. पण त्यांनी केवळ तीनच वेळा त्यांचा पराभव केला असून दोन वेळा स्व. मदन पिसाळ यांनी पराभव केला. लोकशाहीत कुणीही कधी सर्वशक्तीमान नसतो तर जनता ही सुज्ञ आणि शक्तीमान असतो त्यामुळे त्यांनी हवेत इमले बांधू नयेत असेही शिंदे म्हणाले.
विराज शिंदे पुढे म्हणाले, की विद्यमान आमदार महोदय सत्तेच्या धुंदीत इतके मग्न आहेत की त्यांना सर्वसामान्य जनतेचा विसर पडला आहे. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांशी केलेल्या गद्दारीची देखील त्यांना लाज वाटत नाही. उलट ते त्याचे लंगडे समर्थन करीत आहेत. खासदार पदासारखे मोठे पद मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने शक्तीप्रदर्शन व्हायला पाहिजे होते. ज्या पद्धतीने त्यांचे जंगी स्वागत व्हायला पाहिजे होते त्या पद्धतीने झाले नाही. त्यांच्या स्वागताला आमदारांचे अंकीत, कंत्राटदार, लाभार्थी,कारखान्याचे कर्मचारी, बॅंकेचे कर्मचारी यांची तुरळक गर्दी होती. सर्वसामान्य नागरीक या स्वागतापासून दूरच राहिले असेही विराज शिंदे यांनी नमूद केले.
राजकीय दबाव टाकून खासदारकी जरी मिळविली असली तरी आपल्या खासदारकीचा उपयोग सर्वसामान्यांच्या भल्यासाठी करावा. कंत्राटदार आणि ठेकेदारांच्या भल्यासाठी करु नये असा सल्लाही विराज शिंदे यांनी यावेळी दिला.