या निवडणुकीत आशीर्वाद द्या अन्यथा लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये खात्यातून काढून घेईन”, आमदार रवी राणां
आगामी विधानसभा निवडणुकीत मला मतंरुपी आशीर्वाद द्या, नाही तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडक्या बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन, असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं आहे. अमरावतीत आज महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं. त्यांच्या विधानानंतर विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.
“सरकारने महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिवाळीनंतर ही रक्कम वाढवून तीन हजार रुपये केली पाहिजे. आज सरकारने तुम्हाला १५०० रुपये दिले आहेत. उद्या तुमचा भाऊ म्हणून मी ही रक्कम तीन हजार करण्याची विनंती सरकारकडे केली, तर तुम्हाला तीन हजार मिळू शकतात. पण ते तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तुम्ही मला तुमचा भाऊ म्हणून मतरुपी आशीर्वाद द्याल. पण जर तुम्ही या निवडणुकीत मला आशीर्वाद दिला नाही, तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन”, असं आमदार रवी राणा म्हणाले. रवी राणांच्या या विधानानंतर उपस्थित महिलांमध्ये जोरदार हशाही पिकला.