कराड टेंभू येथील अनाथ आश्रमातील सेक्स स्कॅण्डल दोषीवर कठोर कारवाई करण्याची जनतेतून मागणी
सातारा (अली मुजावर)- कराड टेंभू येतील आश्रमात मुलींना वेश्या व्यावसायात ढकलल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. आश्रम चालक महिला आणि तिच्या प्रियकराच्या पोलिसांनी मुस्क्या आवळून गुन्हे दाखल केले आहेत. कराड पासून जवळ असणाऱ्या टेंभू गावातील निराधार आश्रमात ही घटना घडली. एका युवतीच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला. यामध्ये अनेक महिला आणि मुली अडकल्या असल्याची शक्यता आहे.
कराड पासून जवळ टेंभू गावी आई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित निराधार आश्रम या नावाखाली आरोपी महिला हे अनाथाश्रम ऑपरेट करत होती होती. अनाथ आश्रमामध्ये अनेक अनाथ मुलींची, अनाथ महिलांची, अपंग महिलांची भरती केली जात होती. अनाथालयातील एका महिलेने पुढे येऊन सर्व प्रकार उघडकीस आणला. अनाथाश्रमामध्ये आलेल्या मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचं समोर आलं आहे. आश्रमात राहणाऱ्या एका अनाथ युवतीनं या घटनेला वाचा फोडली. तिनं कराड पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकाराची सर्व माहिती दिल्यानंतर पोलिसांनी रेखा सकट आणि तिचा प्रियकर वाल्मिकी माने या दोघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
अनाथाश्रमात चाललेल्या अनाधिकृत घटनाही समाज माध्यमावर फिरत असल्याची चर्चा आहे.एका ऑडिओ क्लीपमध्ये तर आश्रमात आलेल्या एका गतीमंद मुलीवर झालेल्या आत्याचाराची सेटलमेंट करण्यासाठी चक्क पैशाची देवाणघेवाण झाल्याचा विषयही समोर आला आहे. सध्या पोलिसांनी एका फिर्यादी मुलीवरून याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. महिला आणि मुलींच्या वर झालेल्या अन्यायाबाबत पोलिसांनी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. अनाथ महिलांना आणि मुलींना साताऱ्या सारख्या पुरोगामी जिल्ह्यात असा प्रकार होणे अतिशय निंदनीय आहे.