ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रातून सेवानिवृत्त: श्री. चंदू गुरुजींचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न!
महाबळेश्वर -जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा खरोशीचे मुख्याध्यापक श्री. चंदर आनाजी सकपाळ हे ३८ वर्षे ७ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त दिनांक २८ मे २०२४ रोजी सेवापूर्ती कार्यक्रम त्यांचे मूळ गावी गावढोशी तालुका महाबळेश्वर या येथे संपन्न झाला.
शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान:
महाबळेश्वर व जावली तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात चंदू गुरुजी यांचे मोठे काम आहे. गावढोशी, रेणोशी, शिरणार, खरोशी या शाळांवर त्यांनी सेवा बजावली. सेवा काळात विद्यार्थी विकासाबरोबर ग्रामस्थ यांना व विभागातील पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजवून सांगत शैक्षणिक चळवळ उभी केली. विभागातील शिक्षकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी चंदू गुरुजी कायम अग्रेसर असत. शाळा, शिक्षक, विद्यार्थी, या शिवाय सरांचा सामाजिक संपर्क दांडगा आहे. सामाजिक ऐक्य राखणे व समाजव्यवस्था मजबूत करण्यासाठी ते सातत्याने काम करत असतात.
मान्यवरांनी केले कौतुक:
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचे वडील आदरणीय संभाजी शिंदे, श्री प्रकाश शिंदे साहेब, जावली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार श्री सदाभाऊ सकपाळ, शिक्षक राज्य नेते श्री. उदय शिंदे, शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव, शिक्षक संघाचे दीपक भुजबळ शिक्षक बँक संचालक श्री संजय संकपाळ, शिवसेना तालुकाप्रमुख श्री संजय शेलार, तसेच 105 गाव समाजाचे पदाधिकारी, कोयना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किसन जाधव, सचिव डी के जाधव, शिवसेनेचे पदाधिकारी, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, विभागातील शिक्षक बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि गुरुजींवर प्रेम करणारे लोक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करणाऱ्या मान्यवरांनी चंदू गुरुजी यांच्या विषयी गौरव उद्गार काढले. श्री. चंदर सकपाळ सरांनी आपल्या कारकिर्दीतील विविध शाळातून केलेल्या कामाचा व सामाजिक कार्याचा उल्लेख करताना येणाऱ्या विविध अडचणीवर मात करत आदर्श विद्यार्थी घडवले. त्याचप्रमाणे ईश्वरसेवा या भावनेने जनतेची सेवा केली. सकपाळ सरांविषयी त्यांचे सहकारी शिक्षक बोलताना भारावून गेले त्यांच्यासोबत केलेल्या कामाचा व मदतीचा उल्लेख केला. समाजातील सर्वच थरातील व्यक्तींनी गुरुजींचा सपत्नीत सत्कार केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शिक्षक बँकेचे संचालक माननीय श्री. संजय संकपाळ सरांनी केले.