कृष्णा-कोयना तीरावरील सैदापुरचे श्री पावकेश्वर मंदिर
श्रावण मास नुकताच सुरु झालेला आहे. या निमित्ताने वेगवेगळ्या शिव मंदिरांना दर्शनासाठी आपण जातो.या श्रावणमासातील दुसरे पुष्प गुंफत असताना आज कराडमधील सैदापूर गावातील श्री पावकेश्वर हे महादेव मंदिर आपण आज पाहूया.
कृष्णा आणि कोयना या नदीतीरावर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या परमपवित्र प्रीतिसंगमावर वसलेल्या सैदापूर या गावास फार प्राचीन असा इतिहास आहे. सतराव्या शतकापर्यंत या गावाला शिवापूर या नावाने ओळखले जात होते.
यानंतर अलीआदिलशाहच्या आक्रमणाने कराड भागातील बऱ्याच गावांची नावे बदलण्यात आली होती त्यावेळी शिवापूरची ओळख सुद्धा पुसून या गावाचे नाव सय्यदपूर करण्यात आले होते. त्यानंतर हा शब्द बदल होत होत याचे सैदापूर झाले. याच गावच्या पवित्र भूमीत कृष्णामाईच्या तीरावर पुर्वाभिमुखी असे पावकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. कराडपासून वायव्येस तीन किमी अंतरावर असून याचे सिद्धपुर असेही नाव होते.
कराडची भूमीही अतिशय पवित्र असून या परिसरात सदाशिवगड व वसंतगड हे किल्ले तर आहेतच पण याबरोबर कराड पंचक्रोशीत बारा ज्योतिर्लिग आहेत. या परिसरात श्री क्षेत्र सैदापूर येथील पावकेश्वर मंदिर, प्रितीसंगमजवळील संगमेश्वर (गरूडतीर्थ) मंदिर, मंगळवार पेठेतील करडे पीराजवळील कमळेश्वर मंदिर, गोळेश्वर गावात असलेले गोळेश्वर मंदिर, कापिलचे कपिलेश्वर मंदिर, आगाशिव डोंगरावरील निळकंठेश्वर मंदिर, वारुंजी गावी वरूणेश्वर मंदिर, वनवासमाचीस असलेले धर्मेश्वर मंदिर, खोडशी गावी असलेले कोटेश्वर मंदिर, वडोली निळेश्वर या गावात असलेले निळेश्वर मंदिर, गोटे या गावात असलेले आनंदेश्वर मंदिर, कराडच्या मध्यभागी असलेले हटकेश्वर मंदिर, कृष्णाकाठी भटांच्या बागेतील रत्नेश्वर मंदिर अशी बारा ज्योतिर्लिग आहेत. यातील बरीचशी मंदिरे अठराव्या शतकातील असून ती चुना विटामध्ये बांधलेली आहेत.
कराडच्या प्रीतिसंगमापलीकडे हे सैदापूर गावच्या हद्दीत कृष्णाकाठावर हे पावकेश्वर महादेव मंदिर आहे. श्री पावकेश्वर या शिवमंदिराला भेट देण्यासाठी आपल्याला प्रथम कराड या शहरात जावे लागते. कराड शहरातून मसूर गावाकडे जाताना नगरपरिषदेच्या हद्दीला लागून विद्यानगर अर्थात सैदापूर गाव आहे. कराड ते सैदापूर हे अंतर सहा किमी आहे. हे मंदिर कृष्णा काठावर आहे. या मंदिराकडे जाताना आय टी आय चा रस्ता पकडून सैदापूरमध्ये जावे लागते.
त्यापैकी श्री पावकेश्वर हे सर्वात प्राचीन मंदिर असून या पुरातन मंदिराचे बांधकाम हे साधारण तेराव्या शतकातील आहे. या मंदिराची अनेक दुर्मिळ शिल्पकलेने बांधणी केलेली असून प्राचीन शिल्पकलेचा तो एक उत्तम नमुना आहे. मंदिराला चारही बाजूकडून भक्कम तटबंदी आहे.
पावकेश्वर मंदिरास दोन दरवाजे असून त्यापैकी एक दरवाजा पूर्वेला तर दुसरा दरवाजा उत्तरेच्या बाजूस आहे. ज्यावेळी आपण या मंदिराजवळ पोहोचतो त्यावेळी आपल्याला पूर्वेच्या दरवाजाबाहेर एक खूप उंच अशी दीपमाळ पहावयास मिळते.
या दीपमाळ रचनेवरून ही दीपमाळ सोळाव्या शतकातील असावी असा अंदाज लावता येतो. या मंदिराचा परिसर पूर्णपणे तटबंदीवजा शैलीमध्ये बंदिस्त आहे. परकीय आक्रमणाच्या काळात या मंदिरावर अनेकदा हल्ले झाले असावेत कारण तशा खुणा स्पष्टच मंदिरावर दिसून येतात. तरीही आजही आपल्याला ते मंदिर चांगल्या स्थितीमध्ये असल्याचे पहावयास मिळते. या तटाच्या आतील उत्तर बाजूस पूर्वीच्या काळी राहण्यासाठी सोय होती. पूर्वेकडील बाजूच्या दरवाजाने या मंदिरात प्रवेश केल्यास आपल्याला समोरच प्राचीन दोन नंदीं व एक शिवलिंग पहावयास मिळते.
हेमाडपंथी असणाऱ्या या मंदिराची रचना पूर्णपणे दगडी जोत्यावर एकावर एक अशा प्रकारे रचून हे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरात गेल्यानंतर आतील बाजूस गाभाऱ्यात एक शिवलिंग असून या शिवलिंगाची आकारावरून ( शाळूकावरून ) हे शिवलिंग तेराव्या शतकातील असावे असा सांगता येते.
श्री पावकेश्वर मंदिर हे प्राचीन अशा शिल्पानी नटलेले एक सुरेख मंदिर असून या ठिकाणी बेलपत्र, शरभंशिल्प, गजमुख, कीर्तीमुख, मगरमुख, कमळपुष्प, वेलीबुटी यासारखी रचनात्मक वैशिष्ट्ये ठळकपणे आपल्याला दिसून येतात. या मंदिराचा शिखराचा भाग हा नंतरच्या काळातील म्हणजे शिवकाळात पुन्हा बांधला असावा. मंदिराचे प्राचीनत्व हे मंदिरावर असणाऱ्या शिल्पकलेवरून दिसून येते.
मंदिराचा गाभारा दगडी खांब व कोरीव पाषाणात बांधलेला आहे. गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग आहे.या शिवलिंगावर सतत जलाभिषेक होत असतो.या मंदिराचा सभामंडप सहा खांबावर उभा आहे.सभामंडपात दोन्ही देवडीत डाव्या सोंडेचे गणपती विराजमान आहेत.तसेच मंदिराच्या खांबावर हनुमान, गरुडदेव,गंड भेरुड यांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या दोन्ही बाजूला भक्तगणांच्यासाठी व्यवस्था केलेली पहावयास मिळते.
या मंदिराचे आणखी एक खास वैशिष्ट्य असे आहे की या शिवलिंगावर ओतलेल अभिषेकाचे पाणी हे बहुतांश मंदिरांमध्ये गौमुखीतून बाहेर जाते पण या श्री पावकेश्वराच्या ठिकाणी मात्र अपवाद आहे इथं गौमुखीऎवजी मगरमुख (मगरमुखी) च्यातून बाहेर जाते. मगर ही गंगेची कन्या मानली जाते. अशा पवित्र गंगेच्या मुखातून पवित्र असे गंगाजल मिळावे असा पूर्वी समज असे. असे हे देखणे शिल्प फार कमी मंदिरात आपल्यास पहावयास मिळते.
साधारण अशा प्रकारचे शिल्प तेराव्या शतकातील मंदिरावर दिसते. या मंदिराच्या आवारात पूर्वी एक प्राचीन विहीर होती परंतु ती कालांतराने ती मूजविण्यात आली पण त्या विहिरीचे चौथेरे आजही दिसून येतात. एकूणच श्री पावकेश्वराचे मंदिर प्राचीन व पवित्र असे शिवलिंग मंदिर आहे.
श्री पावकेश्वराच्या मंदिरास सतराव्या शतकात सातारच्या छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांचे चिरंजीव यांच्याकडून इनाम भेटल्याचे म्हटले जाते तसेच कराड प्रांताचे असणारे पंतप्रधीनिधी घराण्याचे हे श्रद्धास्थान होते. त्यांनी या ठिकाणी दिवाबत्तीच्या सोईसाठी एक गिजरे नामक ब्राम्हणाची व्यवस्था केली होती. या मंदिराचा परिसर हा वीस गुंठे क्षेत्रफळाचा आहे. सोमवारी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष करून या ठिकाणी कराड आणि परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने हजेरी लावतात.
या पावकेश्वर मंदिराबरोबरच या ठिकाणी रेणुका देवीचे एक पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात सिहासनावर स्थित रेणुका मातेची पुरातन मूर्ती असून तिच्यावर चांदीचा मुखवटा आहे. याशिवाय या ठिकाणी नव्याने घडविलेली मूर्तीसुद्धा आहे. या नव्या मूर्तीच्या दोन्ही बाजूस परशुराम आणि जमदग्नीच्या मूर्ती आहेत. पौष महिन्यात या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येतात.
कृष्णा-कोयनेच्या परमपवित्र अशा तीरावर वसलेल्या मौजे सैदापूर गावातील श्री पावकेश्वराच्या मंदिराचा जिर्णोद्धार तातडीने होणे गरजेचे असून, वेळेत हा जिर्णोद्धार न केल्यास गर्भगृहाच्या कललेल्या भिंती कोसळू शकतात.
मूळचे तेराव्या शतकातील असलेले आणि शिवकाळामध्ये नावारुपाला आलेल्या या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी सैदापूर ग्रामस्थ आणि देवस्थान समिती प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने लोकप्रतिनिधी अथवा पुरातत्त्व विभागाने या मंदिराचे जुने सौंदर्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
पुणे ते कराड १६५ किमी तर सातारा ते कराड ५५ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर कराड आहे. कोल्हापूर-कराड अंतर ७० किमी आहे. कराड शहरात अथवा विद्यानगर परिसरात राहण्यासाठी लॉजेसची सोय आहे. या ठिकाणी आपण वर्षभरात कोणत्याही ऋतूत येऊ शकता विशेष करून पावसाळ्यात या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य परिसर असतो.
कराड दर्शनच्या या ट्रेकमध्ये या मंदिराबरोबरच आपल्याला कराडच्या वायव्येस नऊ किमी अंतरावर वसंतगड, इशान्येस सहा किमीवर सदाशिवगड आणि आग्नेयेस सहा किमीवर आगाशिव डोंगर, कराडमधील ऐतिहासिक मनोरे, नकट्या रावळाची विहीर, कृष्णा कोयना या नद्यांचा प्रीतीसंगम, कराड जवळील मसूर व माजगाव येथील समर्थ स्थापित मारुती, तळबीड येथील हंबीरराव मोहिते स्मारक ही ठिकाणे आपल्यास पहाता येतात. याशिवाय येथून जवळच चौरंगीनाथ, मच्छिंद्रगड आणि कराड परिसरातील बारा ज्योतिर्लिंगे असल्यामुळे दोन दिवसांचा वेळ काढून आपण आला तर वरील ठिकाणे आपल्यास पाहता येतात.
सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,
देऊर
९९७५७५९३२५