सातारा हिल हाफ मॅरेथॉनमुळे सातारा बनले मॅरेथॉनमय
मराठ्यांची राजधानी सातारा येथे सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी ‘जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ स्पर्धा रविवारी दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे. या स्पर्धेत जवळपास दहा हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविलेला आहे. देशभरातील धावपटूंना एकत्र आणणे हा स्पर्धेचा हेतू आहे. या मॅरेथॉन स्पर्धेने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये ‘द मोस्ट पीपल इन सिंगल माऊंटन रन’ चा किताब प्राप्त करत आपली छाप निर्माण केलेली आहेच. ही स्पर्धा देशातील सर्वात खडतर स्पर्धेपैकी एक अशी ही मॅरेथॉन मानली जाते.
या स्पर्धेचा प्रारंभ पोलीस परेड ग्राउंड येथून होतो. त्यानंतर ही स्पर्धा पोवई नाका, रयत शिक्षण संस्था, नगर परिषद, अदालत वाडा, समर्थ मंदिर, बोगदा, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाटातून, हॉटेल निवांत, प्रकृती आयुर्वेदिक हिल रिसॉर्ट व नित्यमुक्त साई रिझॉर्ट पर्यंत जाऊन पुन्हा त्याच मार्गाने पोलीस परेड ग्राउंड येथे समाप्त होत असते. या स्पर्धेत अनेक मान्यवर धावपटू भाग घेताना आपल्याला पाहायला मिळतात.
ही स्पर्धा सकाळी साडेसहा ते साडेदहापर्यंत आयोजित करण्यात येते. या स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कारांसह सन्मानित करण्यात येते. यासाठी सर्वसाधारणपणे एक्स्पो शुक्रवार व शनिवारी आयोजित केला जातो.
ही स्पर्धा नियोजनबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांना पाणी, औषधे, बिस्कीटे, वेदनाशामक स्प्रे, कुलिंग स्टेशन इत्यादीची व्यवस्था करण्यात येते. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी फूड पॅकेट्सचीदेखील व्यवस्था करण्यात येते. त्याशिवाय स्पर्धेच्या मार्गावर जर एखाद्या स्पर्धकाला जर काही त्रास झालाच तर त्या स्पर्धकाला त्वरित प्रथमोपचार कसा करता येईल इत्यादी आणि अशा प्रकारचे प्रशिक्षण तेथील सर्व स्वयंसेवकांना देण्यात येते. जर त्यातून एखाद्या स्पर्धकाला जास्तच त्रास झालाच तर स्पर्धेच्या मार्गावर सुसज्ज अशा रुग्णवाहिका तैनात केलेल्या असतात. ज्यामुळे अशा स्पर्धकाला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करता येते. साताऱ्यातील काही हॉस्पिटलमध्ये अशा बेड्स सुद्धा राखून ठेवल्या जातात.अशा सर्व प्रकारे अतिशय योजनाबद्ध आणि नियोजनपूर्वक या स्पर्धेचे आयोजन आणि संयोजन करण्यात येते.
या स्पर्धेमुळे संपूर्ण सातारा शहर मॅरेथॉनमय होऊन जात असते. या स्पर्धेसाठी अतिशय पोषक अशी वातावरण निर्मिती यामुळे होत असते आणि या सर्वामधून सर्व सातारकर नागरिक एक झाले असून त्यामुळे सातारा शहराचे वैभव वाढून पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलादेखील उस्फूर्तपणे व तेवढ्याच तयारीने स्पर्धेत आपला सहभाग नोंदवून साताऱ्याची नवी ओळख निर्माण करून दिली जात आहे.
निसर्गरम्य आणि नागमोडी घाट रस्त्यांवर तसेच हिरव्यागार डोंगररस्त्यावर जाणाऱ्या या स्पर्धेचा सुंदर असा मार्ग यामुळे ही स्पर्धा जगभरातील सर्व स्पर्धकांच्या पसंतीला उतरली आहे. सातारच्या लौकिकाला एका उंचीवर नेण्याचा या स्पर्धेद्वारे प्रयत्न असणार आहे. स्पर्धेच्या मार्गावर धावताना स्पर्धकांना चिअरिंग टीम प्रोत्साहन देत असते. ढोल, ताशा, लेझीम पथक तसेच पारंपरिक वाद्य वाजवून स्पर्धकांचा उत्साह वाढविला जातो. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले जात आहे.
सातारा शहरात ही स्पर्धा पार पडत असली तरी नव्याने पहिल्यांदाच या स्पर्धेत धावणाऱ्यानी काही सूचना लक्षात ठेवल्या पाहिजेत:
१.मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदाच धावणाऱ्यांनी शर्यतीच्या २ ते ३ महिने आधीपासून दर आठवड्याला आपले अंतर विशिष्ट वेळेत पार करायचे अंतर वाढवित नेण्याचे नेण्याचे लक्ष्य आखायला हवे. आठवड्यातून ४ ते ५ वेळा अगदी आरामशीर गतीने सराव केला पाहिजे, त्यामुळे तुमची तग धरण्याची क्षमता वाढत जाईल.
२. दर ८ ते १० दिवसांतून एकदा लांबचे अंतर धावून पार केले पाहिजे व प्रत्येक वेळी हळूहळू त्यात काही मैलांच्या अंतराची भर टाकली पाहिजे.
३. प्रत्यक्ष शर्यतीच्या दिवसाच्या २ ते ३ आठवडे आधी धावण्याचे अंतर तसेच खडतर प्रशिक्षणाचे प्रमाण कमी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे शर्यती आधीच्या काही दिवसांत तुमच्या शरीराला पुरेसा आराम मिळू शकेल.
४. मॅरेथॉनच्या आधी येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये चांगली झोप घेऊन शरीराला पुरेशी विश्रांती देत शरीराची झीज व थकवा भरून काढण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.
५.मॅरेथॉनच्या आधी आहारामध्ये कोणत्या गोष्टींवर भर असावा? मॅरेथॉनसाठी प्रयत्न करताना व्यवस्थित प्रशिक्षण घेणे आणि व्यायाम करणे अत्यावश्यक आहेच, पण त्याचबरोबर प्रत्येक धावपटूसाठी आरोग्य आणि सकस आहार या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
६. कोणताही व्यायाम करण्यापूर्वी आणि शर्यत सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीराला पाण्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे याची खातरजमा करायला हवी.
७. आहारात ब्राउन राइस, रताळी, अखंड ओट्स, फळे आणि भाज्यांचा समावेश केल्यास कर्बोदके आणि अत्यावश्यक पोषक घटकांचा पुरवठा होण्याची काळजी घेतली जायला हवी.
८. मॅरेथॉन धावणाऱ्याच्या स्नायूंच्या उभारणीमध्ये व शरीराची झीज भरून काढण्याकामी प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात मांस, मासे, अंडी, दूध, डाळी, सुकामेवा आणि बिया इत्यादींमधून मिळालेल्या प्रथिनांचा समावेश असायला हवा.
९. मॅरेथॉनच्या २-३ आठवडे आधी नवीन डाएट प्लॅन सुरू करणे मात्र टाळायला हवे, कारण तुमचे शरीर नव्या पद्धतीशी जुळवून घेण्यात अयशस्वी ठरले तर त्यामुळे तुमच्या तयारीमध्ये व्यत्यय येऊ शकतो. आपल्या प्रशिक्षकांच्या टीममध्ये एक आहारतज्ज्ञ असणे नेहमीच चांगले, कारण ते तुम्हाला तुमच्या शरीराच्या गरजांनुसार तुम्हाला स्वतंत्र डाएट आखून देऊ शकतात.
१०. कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम करण्यासाठी, विशेषत: धावणे आणि खेळांत भाग घेण्यासाठी एकूणच जीवनशैली सुव्यवस्थापित असणे अत्यंत गरजेचे आहे.
११. आपले आरोग्य आणि ऊर्जेची पातळी यावर सतत लक्ष ठेवा कारण तुमच्या सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्याची कोणतीही बाजू तमच्या प्रशिक्षणाच्या क्षमतेवर आणि शरीराची झीज भरून निघण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकते.
१२. डिजिटल जगामध्ये उपलब्ध असलेल्या अॅप्सच्या मदतीने तम्ही आपली स्ट्रेस लेव्हल आणि प्रशिक्षणासाठीची शारीरिक तयारी यांचे परीक्षण करू शकता.
१३. एखादी व्यक्ती धावण्याचा पर्याय निवडू शकते, आणि त्यासाठी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची कोणतीही सक्ती नसते. प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वत:विषयीच अधिक माहिती जाणून घेण्याची ही एक उत्तम संधी आहे. तेव्हा या सर्व प्रक्रियेचा आनंद घ्यायला विसरू नका.
१४. स्ट्रेन्ग्थ आणि क्रॉस ट्रेनिंग हे दोन्ही करा, कारण ते तुम्हाला अधिक चांगले धावण्यास मदत करणारे अत्यावश्यक घटक आहेत, त्याचवेळी ते तुमची ताकद व हालचालींची क्षमता वाढवतात आणि त्यामुळे दुखापतीचा धोका कमी होतो.
थोडक्यात, आपल्या प्रशिक्षणावर नेहमी विश्वास ठेवा. लवकर सुरुवात करा आणि हळूहळू आपला स्टॅमिना वाढवत न्या. स्वत:ला उमेद देत रहा आणि त्या फिनिश लाइनपर्यंत पोहोचण्यासाठी स्वत:चा वेग वाढवायचे लक्षात ठेवा.
सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,
देऊर
९९७५७५९३२५