साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील आदमापुरचे गुरुमाऊली कृष्णात ढोणे यांची भाकणूक
साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील, अशी भाकणूक आदमापुर येथील संत बाळूमामा देवस्थानचे गुरुमाऊली कृष्णात ढोणे यांनी केली. तसेच विसापूर, बोबडेवाडी भागाला निधी कमी पडू देणार नाही. बोबडेवाडी (विसापूर) संत बाळूमामा यांच्या मंदिरात आयोजित केलेल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळ्यास आमदार महेश शिंदे, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित राहून आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाची भाकणूक करण्यात आली. संत बाळूमामाच्या हजारो भक्तांच्या साक्षीने ही भाकणूक झाली. आदमापुर येथील गुरुमाऊली कृष्णात ढोणे यांनी ही भाकणूक लावली आणि विजयाची घोषणाच केली.
संत बाळूमामा यांच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. हजारो भक्तगणांच्या साक्षीने या परिसराच्या विकासाचे आश्वासन आम्ही देतो.असे उदयनराजे म्हणाले.
आमदार महेश शिंदे म्हणाले, खासदार उदयनराजेंनी कृष्णा खोरे महामंडळाचा पाया रचला आहे. या दुष्काळी भागातील जी पाणी योजनेची कामे पूर्ण झाली, ती त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झालेली आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंचे हात बळकट करा.
साताऱ्याच्या माजी उपनगराध्यक्ष दिपाली गोडसे म्हणाल्या, मी विसापूर गावची माहेरवाशीन आहे. संत बाळूमामा मंदिरात जे भाकित होते, ते सत्य झालेले आहे. या भागासाठी मी जी कामे महाराजांकडे मागितली, ती त्यांनी केलेली आहेत. विसापूर, बोबडेवाडी व बुधावलेवाडी या रस्त्याचे काम मंजूर करून घेण्यात आले आहे. आचारसंहिता संपताच हे काम सुरू होईल, येत्या ७ मे रोजी कमळ चिन्हा पुढील बटन दाबून उदयनमहाराजांना प्रचंड मतांनी विजयी करा. यावेळी बाळूमामाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करण्यात आला.
यावेळी युवा नेते हरिश्चंद्र सावंत, घनश्याम मदने, अशोक मदने, बजरंग मदने, मल्हारी बुधावले, विलास मदने, अमोल मदने, अर्जुन मदने, सुहास मदने, सुरज बुधावले, अजिंक्य मदने, सागर मदने, संदीप जाधव आदी उपस्थित होते.