श्रमिक वर्ग हाच देशाच्या विकासाचा खरा कणा – सुधीर पाटील.
कराड : भारत देशाच्या जडणघडणीला मोठा इतिहास आहे. अनेकांच्या कर्तृत्वातून , दातृत्वातून आणि योगदानातून देश घडला आहे. पारतंत्र्यापासून कष्टकरी वर्गाला विशेष महत्व होते. स्वातंत्र्यानंतर हाच कष्टकरी कामगार देशाच्या विकासासाठी हातभार लावत गेला. त्यामुळे देशाची वाटचाल समृद्धीकडे होत गेली. कोणत्याही देशात प्रत्यक्ष मैदानात कार्यरत असणारा श्रमिक हेच खरे देशाचा आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते सुधीर पाटील यांनी केले.
मलकापूर ता. कराड येथील ‘लाईनमन दिवसा’ निमित्त जनमित्रांच्या सन्मान व कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उपअभियंता अमित आदमाने , राज्य सचिव देवकांत , राम चव्हाण , प्रवीण पाटील यासह प्रमुख उपस्थित होते. महावितरणच्या वतीने दरवर्षी ४ मार्च हा दिवस लाईनमन दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी उपस्थित सर्व जनमित्रांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पाटील म्हणाले , अतिशय खडतर परिस्थितीत ऊन, वारा, पाऊस, थंडी, नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती या सगळ्यांमध्ये जनमित्र अगदी जीवाची जोखीम पत्करून समाजसेवा करत असतात. लोकशाहीर नेहमी सांगत ही पृथ्वी नागाच्या फणावर नव्हे तर कष्टकरी कामगारांच्या मनगटावर तरली आहे. वास्तविक देशासाठी अविरत झटणाऱ्या कामगारांच्या प्रती समाजातील प्रत्येकाने कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
रेठरे शाखेचे कनिष्ठ अभियंता प्रवीण पाटील यांनी सूत्रसंचलन केले तर माळी यांनी आभार मानले.