Follow us

Home » ठळक बातम्या » गुंडेवाडी (ता. वाई) येथील ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

गुंडेवाडी (ता. वाई) येथील ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

वाई, दि. 03 – जलजीवन योजनेत विहीर काढण्यासाठी शासकीय अधिकारी सहकार्य करीत नसल्याच्या निषेधार्थ गुंडेवाडी (ता. वाई) येथील ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. आज पंचायत समिती कार्यालयात प्रमुख अधिका-यांच्या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

जलजीवन योजनेतंर्गत पिराचीवाडी व धावडी तलावाशेजारी विहीर काढून ते पाणी मांढरदेव घाटातील साठवण टाकीत नेण्यासाठी राज्य शासनाने रू. 36 लाख इतका निधी देऊ केलेला आहे. त्यातील पाईपलाईन खुदाईचे निम्मे काम झाले असून धावडी गावाच्या हद्दीत पाईपलाईन खोदण्यास व बंधा-यालगत विहिर काढण्यास धावडी ग्रामस्थांचा विरोध आहे. त्यामुळे काम थांबले आहे. त्याचा परिणाम गुंडेवाडी गावास ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत आहे. वस्तुतः बंधा-याजवळ विहीर काढण्यास धावडी ग्रामस्थ नाहक विरोध करीत आहेत. तर गुंडेवाडी- पिराचीवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत असून पिराचीवाडीला पाणीपुरवठा करणा-या विहिरीतून पाणी देण्यास पिराचीवाडी ग्रामस्थांचा विरोध आहे. अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या गुंडेवाडी गावाचा पाणीप्रश्न सध्या प्रलंबित पडला आहे. त्यावर लवकर उपाययोजना करावी, यासाठी गुंडेवाडी ग्रामस्थांनी पाणी नाही, तर मतदान नाही, असा पवित्रा घेतला आहे.

गुरूवारी पंचायत समिती कार्यालयात प्रमुख अधिका-यांच्या उपस्थितीत दोन्ही गावातील प्रमुख ग्रामस्थांची बैठक झाली. त्यामध्ये अधिका-यांनी दोन्ही गावांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र काम कधी सुरू करणार याचा तपशिल जाहीर केला नाही. केवळ तोंडी आश्वासन देऊन ग्रामस्थांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र गुंडेवाडी ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. वस्तुतः धावडी गावासाठी पाणीपुरवठा करणा-या चार विहीरी आहेत. तसेच या योजनेतून काढणार असलेली विहीर ही धावडी व पिराचीवाडी या दोन्ही गावांच्या पाणीपुरवठा करणा-या विहीरींच्या वरच्या बाजूला बंधा-यालगत आहे. त्यासाठी लघु पाटबंधारे विभागाची परवानगी आहे. तसेच भूजल सर्व्हेक्षण विभागाचा अहवाल प्राप्त झालेला आहे. नवीन विहीर ही जुन्या विहिंरीपासून सुमारे 150 मीटर लांब आहे. त्यामुळे जुन्या विहींरीच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. असे असताना देखील धावडी गावचे ग्रामस्थ आक्रमकपणे विरोध करीत आहेत. त्यामुळे प्रशासनानेच या विहीरीचे खोदकाम पोलीस बंदोबस्तात करून द्यावे, असे गुंडेवाडी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे गुंडेवाडी गावाच्या पाण्याचा प्रश्न मागील वर्षापासून प्रलंबित राहिला असून त्यावर कोणताच तोडगा निघत ऩसल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन लोकसभा निवडणुकीवरील आपला बहिष्कार कायम ठेवला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket