वडजाईदेवीच्या यात्रेकरूंना मोफत पाणीपुरवठा
उद्योजक नितीन ओव्हाळ यांचा उपक्रम , हजारो भाविकांची सोय
खंडाळा : खंडाळा तालुक्यासह जिल्हयातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वडजाईदेवीच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. मात्र यावर्षी पिण्याच्या पाण्याची कमतरता असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये या सामाजिक दृष्टीकोनातून श्रीसमर्थ सदगुरु उदयोग समूहाचे प्रमुख नितीन ओव्हाळ यांनी स्वनिधीतून यात्रेकरूंसाठी दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्याने हजारो भक्तांची सोय झाली आहे. त्यांच्या या सामाजिक दायित्वाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक या गावी खंडोबा डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या वडजाईदेवी हे देवस्थान हजारो लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात देवीची यात्रा भरते. त्यामुळे भक्तांची मोठी गर्दी होत असते. यावर्षी मोठ्या उत्साहात यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र तालुक्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याचीही मोठी कमतरता जाणवू लागली आहे. पण याचा देवीच्या यात्रेवर कोणताही परिणाम होऊ नये आणि येणाऱ्या लोकांना पाण्याची सोय व्हावी या सामाजिक दृष्टीकोनातून उद्योजक नितीन ओव्हाळ यांनी स्वखर्चातून दहा टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. दिवसभर हे टँकर लागेल तेवढे पाणी पुरवत आहेत त्यामुळे हजारो भक्तांची सोय झाल्याने तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे.
वास्तविक नितीन ओव्हाळ यांनी नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील गोरगरीब गरजूंना हवी ती मदत करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. समाजसेवेच्या याच भावनेतून त्यांनी यात्रेकरुंना पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे ही यात्रा निर्विवाद पार पडत आहे.
तालुक्यातील सद्यस्थिती पाण्याबाबत बिकट आहे. गावोगावी पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. या स्थितीत वडजाईदेवीची यात्रा निर्विघ्नपणे व्हावी. लोकांची सोय व्हावी या शुद्ध हेतूने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी दहा टँकरद्वारे लागेल तेवढे पाणी उपलब्ध करून दिले जाईल. समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे याची जाणीव ठेवून कायम काम करीत राहणार आहे.
नितीन ओव्हाळ , उद्योजक – सामाजिक कार्यकर्ते