साताऱ्यात भरदिवसा वृक्षाची कत्तल रोखण्यात यश; छायाचित्रकार प्रमोद इंगळे यांची सतर्कता
नगरपालिका प्रशासकाचा कारभार रामभरोसे, वृक्षसंवर्धन समितीही कागदावरच
सातारा (प्रतिनिधी): साताऱ्यातील राजपथावर आकर्षक झाडे लावण्यात आली आहेत. गेल्याच महिन्यात कमानी हौदाच्या परिसरातील एका दुकानाच्या फलकाला अडथळा ठरत असल्याने मध्यरात्रीच्यावेळी वृक्ष तोडण्याची घटना ताजी असतानाच आज शुक्रवारी एका मंडपाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या वृक्षाच्या फांद्या दिवसाढवळ्या तोडण्याची घटना घडली आहे. छायाचित्रकार प्रमोद इंगळे यांच्या सतर्कतेमुळे वृक्ष तोडण्याचा प्रकार थांबला असला तरी दिवसाढवळ्या वृक्षावर कुऱ्हाड उगारणाऱ्यांविरुद्ध पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला असून संबंधितांवर नगरपालिका कारवाई करणार का याकडे सातारकर पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागले आहे.
एका मंडळाचे मंडप टाकण्याचे काम सुरू असताना त्यातील मंडप टाकणाऱ्या व्यक्तींनी मंडपास अडथळा ठरणाऱ्या व सातारा नगरपालिकेने लावलेल्या रस्त्याकडेच्या एका वृक्षाची तोड करण्यास सुरुवात केली. काही फांद्या तोडल्यासुद्धा. ही बाब त्या ठिकाणाहून जात असताना पर्यावरणप्रेमी छायाचित्रकार प्रमोद इंगळे या माध्यम प्रतिनिधीच्या निदर्शनास आली. संबंधितांना वृक्षतोड करण्यास मज्जाव करत त्यांनी विचारणा केली. यावेळी संबंधीत कार्यकर्ते व मंडप उभारणी करणाऱ्या व्यक्तींनी उडवाउडवीची उत्तरे देत वृक्षतोड थांबविली. अन्यथा तेथील वृक्ष पूर्णपणे तोडण्यात आले असते.
दरम्यान सातारा शहरातील विविध ठिकाणच्या वृक्षांच्या फांद्या पालिकेची अथवा वृक्ष प्राधिकरणाची परवानगी न घेता तोडल्या जात आहेत. ते कृत्य करताना वृक्षांना इजा केल्या जात आहेत. अशा घटना वारंवार घडत असून नगरपालिका प्रशासन मात्र सुस्त आहे. त्याबाबत तत्काळ कारवाई का केली जात नाही असा प्रश्न सातारकर पर्यावरण प्रेमी विचारत आहेत.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी “वृक्ष लावा, वृक्ष जगवा ” हे आवाहन आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखायचा असेल तर वृक्षतोड थांबली पाहिजे. नवीन वृक्ष लागवडीबरोबरच ती जगवायला हवी, असेही आवाहन सतत केले जात असते. या आवाहनांचा किती परिणाम झाला किंवा होतो आहे, हे सातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अव्याहतपणे होत असलेल्या वृक्षतोडीतून स्पष्ट होत आहे.
वास्तविक वृक्षतोड थांबविण्याचे कोणतेच प्रयत्न कोणत्याही पातळीवर होत नाही, ही वस्तुस्थिती कुणीही नाकारू शकत नाही. पावसाळ्यात झाडे लावण्याचे कार्यक्रम पार पाडले जातात व त्या कार्यक्रमांचे फोटो माध्यमांमधून छापून आणले जातात. एकदा अशा कार्यक्रमांमधून फोटो छापून आले की, लावलेल्या झाडांचे काय झाले, ती जगली की नष्ट झाली, याकडे तेवढ्याच तत्परतने बघितले जात नाही. वृक्षसंवर्धनाबाबतीतही हीच उदासीनता अनुभवास येत आहे.
सध्या सातारा शहरात बांधकामांना अथवा रस्त्यांना अडथळा ठरणारी झाडे बेमुर्वतपणे तोडली जात आहेत. खासगी जागेतील झाडे तोडण्यासाठी पालिकेची परवानगी घ्यावी लागते, हे सुशिक्षित जाणत्या नागरिकांना माहीतच नाही. याला कायद्याचे अज्ञान म्हणावे की, ढोंग? वृक्ष तोडणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो, याची भीतीही तोडणाऱ्यांना नाही. सार्वजनिक ठिकाणांवरील झाडे सर्रास तोडली जातात, पण त्यास मज्जाव कुणीच करीत नाही. ज्यांच्यावर वृक्षसंवर्धनाची जबाबदारी आहे, ती सातारा पालिकेची वृक्षसंवर्धन समिती अस्तित्वात आहे, असे वाटत नाही.
वृक्ष संवर्धन समिती सुस्त
एकीकडे साताऱ्यात पर्यावरणप्रेमी एकत्र येऊन ‘हरित सातारा’ ही वृक्ष लागवडीसाठी चळवळ उभी करून कृतिशील उपक्रम राबविताना दिसत असताना शहरात ठिकठिकाणी होणारी वृक्षतोड रोखण्यासाठी मात्र पालिकेची वृक्षसंवर्धन समिती कुठेही सक्रिय नसल्याचे चित्र आहे. समितीने वृक्षवाढीसाठी प्रयत्न करतानाच वृक्षतोड रोखण्यासाठी कायद्यानुसार कोणतेही कठोर पाऊल उचलले असल्याचे दिसत नाही. त्यामुळेच अशा प्रवृत्तीना अभय मिळत असून पालिकेची समिती नेमकी कशात व्यस्त आहे, हे मात्र न उलगडणारे कोडेच आहे.