मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यानंतर आता केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असून पावसामुळे अनेक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. तसेच केरळमधील दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार
नैर्ऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा अंदमान-निकोबार बेटांवर आणि नंतर केरळमध्ये दाखल होतात. तेथून नंतर टप्प्याटप्प्याने मोसमी पाऊस महाराष्ट्र आणि देश व्यापतो. नैऋत्य मान्सून केरळमध्ये ३१ मे पर्यंत दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तर महाराष्ट्रात मान्सून १० ते ११ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा पाऊस सामान्य राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सूनच्या आधी सध्या शेती मशागतीला वेग आल्याचं दिसून येत आहे.