सह्याद्रीचे लचके काढणारे गुन्हेगार कोण?
सातारा -(अली मुजावर )सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विदर्भाबाहेर असलेला महाराष्ट्रातील हा एकमेव व्याघ्रप्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात वसलेला. सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य शेजारच्या सांगली , कोल्हापूर जिल्ह्यात विस्तारलेलं चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून हा व्याघ्र प्रकल्प निर्माण झाला आहे.
प्रकल्पातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवरील डोंगरातील अवैध बांधकामे व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र अधिवासाच्या मुळावर येणार आहे. ही अतिक्रमणे प्रकल्पाचा मूळ हेतू धोक्यात आणू शकतात त्यामुळे सह्याद्री व्याघ्र राखीवच्या यंत्रणेने तातडीने या आक्रमणांना पायबंद वेळीच घालणे गरजेचे झाले आहे.
सह्याद्री वाचवा अभियान हे सातारा व रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झाले आहे. गावक्षेत्रातील खाजगी जमिनी विकल्या जाणार नाहीत असे काही ठराव गावाकडून होऊ लागले आहेत. असे असतानाही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील गावे आणि तेथील जमिनी धनदांडग्यांना विकल्या जात असल्याची पोलखोल साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली होती.
जैवविविधता आणि निसर्गसंपदा जपण्यासाठी सुरु केलेल्या सह्याद्री वाचवा मोहिमेतंर्गत माहिती अधिकारातून धक्कादायक बाब उघड केली आहे. तापोळा कांदाटी परिसरात गुजराती इन्वेस्टर आले आहेत. स्थानिक सर्वसामान्य शेतकऱ्यांना मात्र या कांदाटी- नंदुरबार-मुंबई गुजरात कनेक्शनचे नेमके गौडबंगाल काय? हे अद्याप गुलदस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.
संबधित गाव हे पुनर्वसित गाव आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लोकवस्ती वास्तव्यास नाही. मात्र याठिकाणी शासनाचे लाखो रुपये खर्च करून मागील वर्षी शासकीय योजनेतून पुरवण्यात आलेला वीज व पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे. यासाठी जबाबदार असणारे प्रशासनातील अधिकारी कोण? याचा तपास करणे गरजेचे आहे. निसर्गाची कृपादृष्टी असणारा सातारा जिल्हा सह्याद्रीचा मानबिंदू आहे.पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सह्याद्रीतील जैवविविधता व कांदाटी खोऱ्यातील निसर्ग सौंदर्य वाचवण्यासाठी पर्यावरणास धोका पोहोचवत असलेल्या झाडाणी आणि अन्य परिसरातील राजरोसपणे सुरू असणारी बांधकामे थांबवणे गरजेचे आहे.