बदलत्या हवामान परिस्थितीत पर्यावरण पूरक खोडवा ऊसाच्या शाश्वत व विक्रमी उत्पादन वाढीसाठी कुशल प्रशिक्षक निर्मिती कार्यशाळा
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २१ मे २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा येथे “बदलत्या हवामान परीस्थितीत पर्यावरणपूरक खोडवा ऊसाच्या शाश्वत व विक्रमी उत्पादन वाढीसाठी कुशल प्रशिक्षक निर्मिती कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे.
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बँकेमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक पिक असणा-या ऊस पिकाचे एकरी उत्पादन वाढविणेचा संकल्प बँकेने हाती घेतला आहे, त्यास अनुसरुन महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सातारा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक व कार्यक्षेत्रातील सहभागी साखर कारखाने यांचेमध्ये जिल्हयातील शेतक-यांचे ऊस उत्पादन वाढीसाठी सामंजस्य करार संपन्न झाला असून सातारा जिल्ह्यातील ३००० शेतक-यांचे माती व पाणी नमुने तपासून मृदा आरोग्य पत्रिका प्रदान करणेत आली आहे, या उपक्रमाअंतर्गत माती व पाणी परिक्षणाचा होणारा खर्च हा बँकेने व साखर कारखान्याने उचलला असून आरोग्य पत्रिकेतील निर्देशंकानुसार उपक्रम राबविणेकरिता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे मार्गदर्शनाने कार्यक्षेत्रातील सहभागी साखर कारखान्यांच्या शेती व ऊस विकास विभागातील कर्मचारी व अधिकारी यांचे एक दिवसीय कुशल प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणेत आली आहे.
या कार्यशाळेस महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरु, विद्यापिठातील तज्ञ हे जलसिंचन व्यवस्थापन, खते व औषधे फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, खोडवा व्यवस्थापनाचे अर्थशास्त्र, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत, कार्यशाळेस बँकेचे मार्गदर्शक जेष्ठ संचालक मा. आ. श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीसह बँकेचे मा. अध्यक्ष, मा, उपाध्यक्ष व मा संचालक मंडळ सदस्य तसेच कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांचे चेअरमन व कार्यकारी संचालक, शेती व ऊस विकास विभागातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेस जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या शेती व ऊस विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील प्रगतीशील खोडवा ऊस उत्पादक शेतक-यांनी बहुसंख्येने उपस्थित राहणेचे आवाहन बँकेचे अध्यक्ष मा. नितिनकाका पाटील यांनी केले आहे.